पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक संपत गाढवे (वय- 58) यांनी पोलीस ठाण्यातील भंडारगृहात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ड्यटुीवर आले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सहायक पोलीस उपनिरीक्षक संपत गाढवे यांना घशाचा कर्करोग होता. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गाढवे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी आजाराला कंटाळून जीवन संपवत असून यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजारी असल्याने गाढवे यांना भंडारगृहाची ड्युटी देण्यात आली होती. त्याच ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडली त्यावेळी बहुतेक सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बाहेर गेले होते. गाढवे यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गाढवे यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.