मुंबई ATS ची पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई, ड्रग्जचा कारखाना उध्वस्थ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मेफेड्रोन ड्रग्जचा (एमडी) विळखा वाढत असतानाच दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात धडक कारवाई करत एमडी ड्रग्जची फॅक्टरीच उद्धवस्त केली आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथे ही कारवाई करण्यात आली आहे. ही करावाई दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटने केली असून 5 कोटी 60 लाख 60 हजार रुपयांचा 14 किलो 300 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी महेंद्र परशुराम पाटील (वय-49) आणि संतोष बाळासाहेब आडके (वय-29) या दोघांना अटक केली आहे.

अल्फा केमिकल कंपनीत ड्रग्जची फॅक्टरी असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्याआधारे ही करवाई करत एमडी ड्रग्जचा महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा अड्डा उद्धवस्त करण्यात आला आहे. या कारवाईत 80 कोटी रुपये किंमतीचे केमिकल जप्त करण्यात आले आहे.

असे लागले धागेदोरे
महाराष्ट्र एटीएसच्या जुहू युनिटच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये महेंद्र पाटील आणि आडकेला अटक केली होती. त्यावेळी पुण्याच्या सासवड तालुक्यातील एका कारखान्यातून 14 किलो एमडी हस्तगत केले होते. तपासामध्ये आडके याचा आणखी एक कारखाना असून या ठिकाणी देखील एमडी तयार केले जात असल्याची माहिती एटीएसला समजली. त्यानुसार पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील दिवे येथील अल्फा केमिकल या कंपनीत एटीएसचे अधिकारी दया नायक यांच्या पथकाने छापा टाकला.