‘ड्रग्स’ च्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 53 कोटींचा साठा जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई ATS ने केलेल्या कारवाईत तब्बल 129 किलो MD ड्रग्ज जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 53 कोटी रुपये किंमत आहे. याप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने केलेल्या ड्रग्सच्या काळ्या धंद्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा करण्यात येत आहे. या रॅकेटच्या माध्यमातून फक्त देशातच नाही तर विदेशातही ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचा संशय आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येतील अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

जितेंद्र पर्मात (वय-36), अब्दुल रझाक शेख ( वय-47), इरफान शेख (वय-43), सुलेमान शेख (वय-28), नरेश मस्कर (वय-44) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबई एटीएसने सोमवारी (दि.९) रात्री नवी मुंबई येथे छापे घालून दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान विक्रोळी येथे साठा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विक्रोळीत जो साठा सापडला तो पाहून पोलीस देखील चक्रावून गेले. या ठिकाणी पोलिसांनी तब्बल 129 किलो ड्रग्स जप्त केले. त्याचबरोबर 1 कोटी 4 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई पोलिसांनी सर्व माहिती गोळा करून अत्यंत गोपनीय पद्धतीने केली.

एमडी हे अत्यंत उच्च दर्जाचे रसायन वापरून बनविण्यात आलेले आहे. एमडी बनविण्यात येत असलेला कारखाना व वितरित केलेल्या अन्य ठिकाणी शोध मोहीम सुरु असून अमली पदार्थ विक्री करणारे हे देशातील मोठे रॅकेट असल्याचे एटीएस प्रमुख देवेन भारती, उपमहानिरीक्षक जयवंत नाईकनवरे, उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले.