अजमल कसाबला फासापर्यंत नेणार्‍या साक्षीदाराची झुंज अखेर संपली, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – भारतासह संपूर्ण जगाला हादरवणार्‍या मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत दशहतवादी सापडला होता, तो म्हणजे अजमल कसाब. याच दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवून त्याला फासापर्यंत पोहचवणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे आज त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते.

मुंबईतील कामा रूग्णालयाच्या बाहेर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. मे महिन्याच्या सुरुवातीला ते मुंबईत फूटपाथवर आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. प्रकृती बिघडल्याने श्रीवर्धनकर यांना कल्याण येथील खासगी रूग्णालयात भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांनी दाखल केले होते. यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचापूस केली होती. याप्रसंगी फडणवीस यांनी भाजपाकडून त्यांना दहा लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा देखील केली होती.

कोण होते श्रीवर्धनकर ?
मुंबईत 26/11चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. दहशतवाद्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. सीएसटी स्थानकात शेकडो निष्पाप प्रवाशांवर गोळीबार गेल्यानंतर कसाब आणि त्याचा साथीदार सीएसटीच्या बाहेर पडून कामा हॉस्पिटलकडे गेले, तेथे कामा हॉस्पिटलवरही त्यांनी जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात अनेक बहाद्दूर पोलीस अधिकारी शहीद झाले. याच गोळीबारात हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांनाही अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्या दोन गोळ्या पाठीत लागल्या होत्या. तत्पूर्वी आपल्या ऑफिस बॅगने त्यांनी इस्माईलला मारलेही होते. या झटापटीत त्यांनी दोन्ही दहशतवाद्यांना स्पष्ट पाहिले होते.

जेव्हा 26/11 चा खटला सुरू झाला तेव्हा त्यांनी कसाबला ओळखून त्याच्याविरूद्ध साक्ष दिली होती. कसाबला फासावर लटकवण्यात त्यांची साक्ष खुप महत्वाची ठरली होती. शारीरीकदृष्ट्या कमकुवत झालेल्या हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांची आर्थिक परिस्थिती नंतर खुपच हलाखीची झाली होती. निराधार अवस्थेत ते फूटपाथवर आढळले होते. ज्यादिवशी ते फुटपाथवर आढळले होते, तेव्हा ते अनेक दिवसांपासून उपाशी होते. मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील डिसुझा नामक दुकानदाराने त्यांना मदत केली होती. त्यांनतर पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी त्यांची भेट झाली होती.