कौतुकास्पद ! संकटातही रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, विसरुन गेलेल्या प्रवाशाचे 14 लाख केले परत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात विसरलेली तब्बल 14 लाख किंमतीचे सोने आणि रोकड प्रवाशाला परत मिळाली. या रिक्षा चालकाला आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या ऑटो रिक्षाच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. तरीही, त्यांनी रिक्षात विसरलेला लाखोचा ऐवज प्रामाणिकपणाने परत केल्याने त्याचे कौतुक होत आहे. इफ्तिकार शेख असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांचा मिरा रोडच्या रहिवाशांनी सत्कार केला. त्यावेळी प्रामाणिकपणा हेच आपल्या आयुष्याचे तत्व असल्याची भावना इफ्तिकार यांनी व्यक्त केली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इफ्तिकार शेख मुंबईतील मिरा रोडचे रहिवाशी आहेत. त्यांनी रविवारी नाझीन शेख या प्रवाशाला मुंबईतील कश्मिरा भागात सोडले. नाझीन यांना तिथून गुजरात येथे जायचे होते. इफ्तिकार यांनी त्यांना सोडल्यानंतर आणखी काही पॅसेंजर्सना त्यांच्या इच्छित स्थळी सोडले. घरी परतल्यानंतर नेहमीप्रमाणे ऑटो रिक्षा स्वच्छ करताना गाडीत सापडलेली बॅग पाहून त्यांना धक्का बसला. बॅगमध्ये पैसे आणि सोने होते. त्यांनी त्यानंतर थेट कश्मिरा पोलीस ठाणे गाठून ती बॅग पोलिसांना दिली.

पोलिसांनी त्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यांना बॅगेत त्यांना नाझीन यांचा मोबाईल नंबर सापडला. नाझीन यांनी बॅग हरवल्याच लक्षात येताच गुजरातला जाणे रद्द केले होते. त्यांनी त्या रात्री ऑटो रिक्षाचा बराच शोध घेतला पण पोलिसांमध्ये तक्रार केली नव्हती. पोलिसांनी सर्व ऐवज त्यांचाच असल्याची खात्री केली आणि ती बॅग नाझीन यांनी परत दिली. या बॅगेत एकूण 14 लाख रुपयांचा ऐवज असल्याची माहिती आहे.