वाढत्या ‘पेट्रोल-डिझेल’च्या किंमतीमुळं मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांकडे गेले आहेत. यामुळं आता मुंबईतील रिक्षा टॅक्सीनं आपल्या प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली आहे. त्यामुळं वाढत्या इंधनाचा फटका आता सामान्य लोकांनाही बसणार आहे.

ऑटो-टॅक्सीच्या कमीत कमी भाड्यात 3 रुपयांची वाढ झाली आहे. रिक्षाचं प्रारंभिक भाडं हे 18 रुपये होतं. आता त्यात 3 रुपयांची वाढ झाल्यानं ते 21 रुपये झालं आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सीचं भाडं 22 रुपयांवरून 25 रुपये झालं आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी या भाडेवाढीचं स्वागत केलं आहे.

गेल्या 5 वर्षांपासून इंधनाचे दर वाढत होते. त्याशिवाय वाहनाचा मेंटेनन्स आणि विमादेखील वाढला होता. तरीही भाड्यात एका पैशाची वाढ झाली नव्हती. आता पेट्रोल डिझेलसह सीएनजी देखील महाग झाला आहे. त्यामुळं काहीतरी फायदा मिळून दिलासा मिळेल असं संघटनांचं म्हणणं आहे.

अनेक चालकांनी त्यांच्या वाढलेल्या भाड्यावर आनंद व्यक्त केला आहे. कारण कोरोनामुळं एप्रिल ते जूनमध्ये एकही रुपयाचं उत्पन्न मिळालं नव्हतं. अनेकजण उधारी आणि कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. भाडे वाढवल्यानं काहीतरी आशा निर्माण झाली आहे. या भाडेवाढीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर जरूर दिसणार आहे.