1 लाखाची लाच घेताना शाखा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींच्या दुरुस्ती कामाची थकीत बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी 1 लाख रुपायांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारताना मुंबई इमारत व दुरुस्ती पुर्नरचना मंडळ कुलाबा येथील शाखा अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) करण्यात आली. राजकुमार हणमंत वरुडे (वय-53) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे.

याप्रकरणी एका बांधकाम कंत्राटदाराने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 16 फेब्रुवारी 2021 रोजी तक्रार दिली होती. तक्रारदार हे बांधकाम कंत्राटदार असून त्यांनी 2019-20 मध्ये म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारत दुरुस्ती बांधकामाचे काम घेतले होते. तक्रारदार यांना ‘ए’ वार्डातील एकूण 36 दुरुस्तीची कामे मिळाली होती. ही कामे त्यांनी पूर्ण केली आहेत. या कामाचे एकूण बिल 22 लाख 60 हजार रुपये होते. त्यापैकी 5 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले होते.

उर्वरीत बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता राजकुमार वरुडे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी 16 फेब्रुवारी रोजी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभगाकडे लेखी तक्रार केली. दरम्यानच्या काळात अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी राजकुमार वरुडे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची 1 लाख रुपयांची रक्कम स्विकारताना राजकुमार वरुडे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.