मृतांच्या परिवाराला ५ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पहाणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मृतांच्या परिवाराला ५ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहिर केली.

मृतकांच्या परिवाराला ५ लाख रुपये दिले जातील, जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, तसेच जखमींवर पूर्ण उपचार केले जातील. पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यापूर्वी पूल दुर्घटना घडल्यानंतर शासनाने गंभीर दखल घेत स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. मात्र तरीही अशी दुर्घटना घडते. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.