‘लोकांनी व्हिडीओ बनवण्याऐवजी मदत केली असती , तर माझा भाऊ वाचला असता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळल्याची घटना समोर आली . या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 31 जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत वडिलांसोबत खरेदीसाठी क्राॅफर्ड मार्केटमध्ये गेलेल्या जाहिद खान या 32 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे . एरवी एखादी दुर्घटना घडली तर मुंबईकर तातडीने मदतीला धावून जात असतात. परंतु यावेळी मुंबईकरांचं काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं . जाहिदला मदत करण्याऐवजी लोक मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवण्यात व्यस्त होते असे त्याच्या भावाने म्हटले आहे.

जाहिद हा घाटकोपर येथील रहिवासी होता . काही सामानाची खरेदी करण्यासाठी जाहिद गुरुवारी वडिलांसोबत मार्केटमध्ये जात होता. यावेळी सीएसएमटीजवळचा रस्ता खालून क्राॅस करून जाण्याऐवजी ते यावेळी पुलावरून गेले आणि काळाने घाला घातला . सदर पूल कोसळला. या दुर्घटनेत त्याचे वडिल सिराज खान जखमी झाले . परंतु जाहिद खान याचा यात मृत्यू झाला . त्याच्या वडिलांनी त्याला उचलून रुग्णालयात नेलं. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

यावेळी बोलताना त्याच्या भावाने म्हटले की , “वाईट गोष्ट म्हणजे माझे काका तिथे असलेल्या लोकांकडे मदत मागत होते. परंतु कोणीही मदत करण्यास पुढे आलं नाही. सर्वजण मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत होते. जर व्हिडीओ न बनवता त्यांनी मदत केली असती तर आज माझा भाऊ जिवंत असता. “अशी संतप्त प्रतिक्रिया जाहिदचा भाऊ कमाल खानने दिली.