५० कोटींचा घोटाळा करुन लंडनला पळून जाणाऱ्या लकडावालाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने खंडाळा येथील ५० कोटी रुपयांची ४ एकर जमीन बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला याला अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला पळून जात असताना अटक करण्यात आली.

युसूफ लकडवाला (वय ७४) याने मोहन नायर यांच्या मदतीने मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करुन त्या आधारे खंडाळा येथील ४ एकर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयातील जितेंद्र बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन लकडावाला व मोहन नायर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून लकडावाला फरार झाला होता.

अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला पळून जात असताना अहमदाबाद आर्थिक गुन्हे शाखेने त्याला शुक्रवारी अटक केली अशी माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर उद्या मुंबईत आणण्यात येणार आहे.