राज्य सरकारची मोठी घोषणा ! आता ‘माया’नगरी मुंबईवर राहणार ‘बिग बॉस’चा ‘वॉच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरील हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर गृहमंत्रालयाला जाग आली आहे. गृहमंत्र्यांनी महिलां विषयी सुरक्षेबाबत कोणकोणत्या उपाय योजना केल्या जात आहेत याचा आढावा घेतला. यानंतर अत्याचार आणि गुन्ह्याचे वाढतं प्रमाण यावर नजर ठेवण्यासाठी मोठा निर्णय घतेला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने मास्टर प्लान तयार केला असून प्रत्येक इमारतीवर सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात नियम करण्यात येणार आहेत.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून आणखी तीन हजारांपेक्षा जास्त कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय. केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्यांतर्गत निर्भया फंडातून सध्या मुंबई शहरात सीसीटीव्ही व अन्य प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये शहरातील अंधाऱ्या तसेच धोकादायक जागा निश्चित करून त्या ठिकाणी पथदिवे लावण्यासाठी महापालिकेला निधी देण्यात आला आहे.

पोलिसांच्या वाहनावर व्हिडिओ रेकॉर्डिंग यंत्रणा
या ठिकाणी सीसीटीव्ही, इमर्जन्सी कॉल बॉक्स (एसओ.एस) लावण्याचे काम सुरु आहे. शिवाय शहरातील पोलीस ठाण्यांच्या गस्ती वाहनावर व्हिडिओ रेकॉर्डिंगची यंत्रणा, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना शरीरावर लावण्याचे (बॉडी वॉर्न) कॅमेरा यंत्रणा, टॅबलेट संगणक आदी पुरविण्यात येत आहेत.

मुंबई-पुणे शहरासाठी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प
मुंबई शहर आणि पुणे शहरांसाठी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात मुंबईमध्ये 5 हजार 200 सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत.तसेच दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर शहरात 3 हजार 600 ठिकाणी एकूण 10 हजार 700 कॅमेरे कार्यान्वीत होतील. या सर्व्हेलन्स प्रकल्पात 1 हजार 432 पोलीस वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे.

तक्रारीसाठी खास कक्षाची उभारणी
निर्भया निधीअंतर्गत खास महिलांना तक्रार करता यावी यासाठी कक्ष तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी महिला पोलीस कायदेविषयक सल्लागार तसेच डॉक्टर असणार असून घटनेच्या ठिकाणी तात्काळ जाऊन संबंधित महिलेला मदत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.