मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीदरम्यान फेक बातम्यांना वेसण घालण्यासाठी शासकीय यंत्रणा योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी हे माध्यम कक्षाद्वारे फेक बातम्या, फेक पोस्ट, फेक फेसबुक, ट्विटर अकाऊंट यावर लक्ष ठेवले जात आहे. मात्र, मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचेच बनावट फेसबुक अकाउंट असल्याचे समोर आले आहे.
‘कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रट ऑफ मुंबई सिटी’ या नावाने कुणी अनोळखी व्यक्तीकडून हे फेसबुक अकाउंट चालवले जात आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यम कक्षाच्या निदर्शनास ही बाब आली आहे. त्यानंतर तात्काळ त्यांनी सायबर क्राईम सेलेला याबाबत सूचना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बनावट फेसबुक अकाऊंटवर विविध पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे हे अकॉऊंट तात्काळ बंद करण्याच्या सूचना मुंबई जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पोलीस आयुकांना दिल्या आहेत.