‘त्या’ पोलिसाला ‘सलाम’, जीवाची पर्वा न करता वाचवलं वृध्दाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई पोलीसांचे नेहमी कौतुकच केले जाते, ते त्यांच्या कामामुळे. पुन्हा एका मुंबई पोलीसाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मुंबईतील आरे कॉलनीतील नाल्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाला वाचवण्यासाठी मुंबई पोलीसातील कॉन्स्टेबलनं जीवाची बाजी लावली. विशाल पाटील असे या बहाद्दर पोलीस कॉनस्टेबलचे नाव आहे. विशाल पाटील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यात उडी घेतली आणि वृद्धाला सुरक्षित बाहेर काढलं.

गुरुवारी पोलीसांना आरे कॉलनीतील नाल्यात वृद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच तेथे मोबाइल व्हॅन पाठवली. या व्हॅनमध्ये विशाल पाटील हे उपस्थित होते. तेथे पोहचल्यावर नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वृद्ध व्यक्ती वाहून जात असल्याचं पाटील यांनी पाहिलं. तेव्हा त्यांनी काही विचार न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता थेट नाल्यात उडी घेतली. त्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले. पाटील यांनी वृद्धाला खांद्यावर घेत सुरक्षित बाहेर काढलं. त्यांचे काम होते म्हणून त्यांनी लोकांचे प्राण वाचवलेच पाहिजेत पण ज्याप्रमाने त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून वृद्धाचे प्राण वाचवले त्यामुळे तेथील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

दरम्यान, प्राण वाचवलेल्या वृद्धाचे नाव हंसराज असं होते. बाहेर काढल्यानंतर त्यांना त्वरीत बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हंसराज हे आरे कॉलनीतील युनिट क्रमांक पाचमध्ये ते एकटेच राहतात. ते नाल्यात कसे पडले हे अद्याप कळू शकलं नाही, अशी माहिती पोलीसांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –