‘कोरोना’योद्ध्यांचा मोडून पडला संसार, रात्री पत्नीने तर सकाळी पतीने घेतला जगाचा निरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. देशात देखील कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून महाराष्ट्रात याचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वगाने वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि प्रशासनातील इतर घटक युद्ध पातळीवर काम करत आहेत. मात्र, हे कर्तव्य पार पाडत असताना काही कोरोना योद्ध्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच नायर हॉस्पिटल मधील लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबतची माहिती नायर हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी विभागाकडून देण्यात आली आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे नायर मधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर अदल्याच रात्री त्यांच्या पत्नीचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला होता. 24 तासाच्या आत पती-पत्नीने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे यापुढे कोरोनाला हरवण्यासाठी मोठी मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्याची अजून मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची गरज आहे, हे यावरून स्पष्ट होतं.

दुसरीकडे मुंबई पोलीस दलात आणखी एका जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 52 वर्षीय दिपक हाटे नावाच्या पोलीस हवालदाराला 10 दिवस उपचार घेतल्यानंतर घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतर काही तासातच हाटे यांचा मृत्यू झाला. हाटे यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. हाटे हे बांद्रा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.