सकारात्मक बातमी ! ‘कोरोना’ रुग्णांचा आकडा वाढत असताना मुंबईकरांना मोठा ‘दिलासा’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असून मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांत 50 हजारांचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे. एकिकडे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणूचा वेग मंदावत चालल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या परिसरातील रुग्ण संख्या वाढीचा दर कमी झाला आहे.

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीचा दर 6.62 इतका होता. आता तो खाली आला असून सध्या रुग्ण संख्या वाढीचा दर 3.50 टक्क्यांवर आला आहे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या, धारावी, वरळी, भायखळा या परिसरातील रुग्ण वाढीचे प्रमाण दहा टक्क्यांवरून 1.6 ते 2.4 टक्क्यांवर आलं आहे. पालिकेच्या सहा विभाग कार्यालयांच्या हद्दीतही रुग्णवाढीचा दर तीन टक्क्यांनी खाली आला आहे. या सहा विभागांतील रुग्ण वाढीचा वेग अधिक जास्त होता.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मे महिन्यात कोरोना विषाणूने थैमान घातले. मुंबईतील विभागांमधे रुग्णवाढीचा दर आटोक्यात येत नसल्याने पालीकेने अधिक उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. वरळी, माहीम, दादर, धारावी, प्रभादेवी, सायन, सांताक्रुज़, माटुंगा, ग्रँट रोड, ताडदेव, भायखळा या भागांमधील दैनंदिन रुग्ण वाढ कमी होत चालली आहे.
मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या धारावी, दादर, माहिम या भागातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर 2.4 एवढा खाली आला आहे. या भागात अतापर्यंत मुंबईतील पालिकेच्या सर्व विभागांच्या तुलनेत कोरोनाचे 3 हजार 200 रुग्ण आढळून आले आहेत. पण आता या ठिकाणी रुग्णवाढ कमी झाली आहे. प्रभादेवी भागात रुग्णवाढीचा दर 2.2 टक्क्यांवर आला आहे. तर या भागात आतापर्य़ंत 2200 रुग्ण सापडले आहेत. ग्रँट रोड विभागातील रुग्णवाढीचा दर अनुक्रमे 2.6 टक्क्यांवर तर कुलाब्यातील रुग्णवाढीचा दर हा 2.7 टक्क्यांवर आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.