Coronavirus : मुंबईसाठी चिंताजनक ! धारावीमधील ‘कोरोना’बाधितांचा आकडा वाढतोय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.धारावीत आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधी कोरोनाची लागण झालेल्या महिलेच्या वडील आणि भावाला कोरोनाची लागण झाली असल्याच समोर येत आहे. यांनतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून बलिगा नगर परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

धारावीत ३० वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल होत. याच महिलेच्या ८० वर्षीय वडिलांना आणि ४९ वर्षीय भावाला कोरोना संसंर्ग झाला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असणाऱ्या धारावीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकार आणि आरोग्य विभागाची चिंता वाढत आहे. तर धारावीत आतापर्यंत ७ रुग्ण आढळले असून, यात बलिगा नगमधील ४, वैभव अपार्टमेंट मधील १, तर मुकुंद नगरमध्ये 49 वर्षाचा एक पुरुष आणि मदिना नगरमध्ये 21 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे.

मुंबईत सोमवारी दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईतील एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ५२६ वर पोहचली आहे. त्यापैकी ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, ५९ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. पुण्यातही सोमवारी रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून, सोमवारी एका दिवसात ३७ नवे रुग्ण आढळले आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेणार असून, काही कॅबिनेट मंत्री मुंबई बाहेर असल्याने त्यांच्याशी ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलणार आहे. यात कोरोनाला रोखण्यासाठी अजून कोणत्या उपाययोजना करावे लागतील याबाबतीत चर्चा होणार राज्य सरकारकडून कोणता मोठा ठोस निर्णय घेण्यात येतो हे पाहावे लागणार आहे.