मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच ! BMC नं काढलं नवं परिपत्रक

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांवरील उपचारासंदर्भात मुंबई महापालिकेने रुग्णालयांसाठी नवे परिपत्रक जारी केले आहे. अनेक खासगी रुग्णालये रुग्णांना थेट दाखल करून घेत असल्याचे दिसून येत आहे. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबई महापालिकेला कळवल्याशिवाय कुठेही कोरोना रुग्णांना भरती केले जाऊ नये, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत.

शहरातील खासगी रुग्णालये, नर्सिंग होम आदीनी रुग्णांना दाखल करून घेताना महापालिकेच्या वॉर रूमला त्याची माहिती देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालये हे कोव्हिड रुग्णांकडून ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बिल आकारणी करत आहेत किंवा नाही याची पाहणी महापालिकेच्या नियमकांनी तात्काळ सुरू करावी, असेही आदेशही दिले आहेत. शहरातील सर्वच कोव्हिड सेंटर्सचे तात्काळ फायर ऑडिट सुरु केले आहे. तसेच महापालिकेच्या वतीने तात्काळ 2 हजार 269 बेड खासगी रुग्णालयात उपलब्ध करून दिले आहेत. यात 360 आयसीयू बेड्सचा समावेश आहे.