Coronavirus : दिलासादायक ! मुंबईत आतापर्यंत 70 हजार रूग्ण ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा पसार वेगाने होत असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने आज 3 लाखांचा टप्पा पार केला. तसेच मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे. दिलासादायक म्हणजे राज्यात आणि मुंबईत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात मुंबईमध्ये 1199 नव्या रुग्णांची भर पडल्याने मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 100178 इतकी झाली आहे.


मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात मुंबईमध्ये 1152 रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत मुंबईत 70 हजार 492 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के इतके आहे. मुंबईत दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत एकूण 5647 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 40 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे.


सध्या मुंबईमध्ये 24039 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा दर 54 दिवस आहे तर 12 ते 17 जुलै या कालावधीत रुग्ण वाढीचा दर 1.30 टक्के असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईतील मोठा हॉटस्पट समजल्या गेलेल्या धारावीत कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज दिवसभरात केवळ 6 रुग्ण आढळून आले आहे. धारावीत सध्या 107 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.