COVID-19 : धक्कादायक ! मुंबईत ‘धष्टपुष्ट’ कोरोना रूग्णांत दिसतंय 1 नवीन लक्षण, डॉक्टर देखील ‘हैराण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यातही राजधानी मुंबईत रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, ताप आणि खोकला ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहे. मात्र अशीही बरीच रुग्ण आहेत ज्यांच्यात कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यातच आता नवीन माहिती समोर येत आहे, ज्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. मधुमेह नसणाऱ्या धडधाकट कोरोना रुग्णांमध्ये अनियंत्रितपणे शुगर लेव्हलचे प्रमाण वाढत आहे. हे अनेक वेळा रुग्णांसाठी घातकही ठरत आहे. धडधाकट असणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये हे वेगळे लक्षणे आढळून आल्याने मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर हैरान झाले आहेत.

केईएमच्या डॉक्टरांचं एक पथक अश्या रुग्णांवर अभ्यास करत असून त्यावर लवकरच उत्तर मिळेल असं सांगितलं जात आहे. भारतात सुमारे ७.७ कोटी लोकांना मधुमेह आहे. चीननंतर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मधुमेह रुग्ण असलेला देश आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार देशात सहा लोकांमागे एकाला मधुमेह आहे. त्यातच इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनने २०४५ पर्यंत भारतात १३.४ कोटी मधुमेही रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ६० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. तर त्यापेक्षा कमी वयाचे रुग्ण या आजारातून बरे होत आहे. मात्र, नवीन लक्षणांबाबत माहिती देताना केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले कि, आता २५ ते ५५ वयोगटातील कोरोना रुग्णांमध्ये मधुमेह नसतानाही त्यांची शुगर लेव्हल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत मधुमेह नसलेल्या अनेक रुग्णांनामध्ये साखरचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढताना दिसत आहे. सध्या आम्ही हा प्रकार कसा वाढला, त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्नात आहोत.

फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं कि, हा प्रकार अलिकडेच सुरू झाला आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. गेल्या महिन्यात एका ३५ वर्षीय रुग्णाला दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची शुगर लेव्हल ३३० मिलिग्रॅम होती. त्याच्यात ताप आणि खोकला ही सामान्य लक्षणे होती. त्यांनतर त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण ५०० मिलिग्रॅमवर पोहोचले. त्याने रोज दहा दिवस १५० ते २०० युनिट्स इन्श्युलिन घेतले, त्यांनतर कुठे त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात आले. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांत मधुमेह नसणाऱ्या धडधाकट कोरोना रुग्णांच्या शरीरातील शुगर लेव्हल अचानक वाढू लागल्याने डॉक्टरांसमोर एक नवीन आव्हान निर्माण झालं आहे.