IPL च्या 8 संघात नाही मिळाली संधी, ‘नाराज’ होऊन मुंबईच्या ‘बॉलर’नं केली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील एक क्लब क्रिकेटर सोमवारी रात्री त्याच्या मालाड (पूर्व) च्या घरी मृत अवस्थेत सापडला. एका मित्राने सांगितले की, आयपीएलच्या आठ संघापैकी एकातही स्थान न मिळाल्याने त्याने स्वत:चा जीव घेतला. मुंबईचा हा क्रिकेटपटू करण तिवारी असून त्याला लोकल क्रिकेटमध्ये ज्युनियर डेल स्टेन म्हणायचे. करणची ऍक्शन आणि उंची दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेन याच्यासारखी होती.

२७ वर्षीय करण तिवारीला कुटुंबातील सदस्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडण्यास सांगितले, पण त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण तिवारीने रात्री साडेदहा वाजता गोकुळधाम कोनु कंपाऊंडमध्ये आत्महत्या केली आहे. पोलिसांनी एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) नोंदवला आहे. कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणाले आहेत की, “आम्ही एडीआर नोंदवला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.”

कुरार पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये करनची निवड न झाल्याने तो निराश झाला होता. सूत्रांनी सांगितले की, “करणने उदयपुरमधील आपल्या बेस्ट फ्रेंडला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्याने तो निराश झाला होता. त्याच शहरात राहणार्‍या करणच्या बहिणीला त्याच्या मित्राने माहिती दिली. त्याच्या बहिणीने आईला सांगितले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. करणला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले होते.”

बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणत्याही वयोगटातील राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडूच आयपीएल लिलावात प्रवेश करण्यास पात्र आहेत, परंतु करणने कधीही राज्यासाठी प्रथम श्रेणी, लिस्ट किंवा टी-२० सामना खेळला नव्हता. मात्र करणने अनेकदा वानखेडे येथे आयपीएल संघासाठी गोलंदाजी केली होती, पण बीसीसीआयचे नियम पाळत नसल्याने त्याला संधी मिळाली नाही.

करणच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, “तो राज्य संघासाठी निवड होण्याची अपेक्षा करत होता. त्यापैकी काहींशी तो चर्चा करत होता. तो एक अतिशय उत्तम क्रिकेटपटू होता आणि त्याने त्याच्या शेवटच्या व्हॉट्सऍप स्टेटसवर गोलंदाजी आणि फलंदाजीचे व्हिडिओ अपलोड केले होते. धक्कादायक बाब म्हणजे त्याने असे कठोर पाऊल उचलायचे ठरवले.” करणकडे नोकरी नसल्यामुळे तणावग्रस्त असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.