IPS अधिकारी प्रवीण पडवळ यांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचकडून ‘समन्स’

मुंबई : पोलीसनामा ऑलाइन – पायधुनी पोलीस ठाण्यातील खंडणी आणि आर्म अॅक्ट प्रकरणात तारिक प्रवीण आणि सलीम महाराज यांना अटक न करता हे प्रकरण मिटवल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी प्रवीण पडवळ यांना मुंबई क्राईम ब्रँचने समन्स पाठवले आहे. हे प्रकरण 2018 मधील पायधुनी पोलीस ठाण्यातील असून हे प्रकरण मिटवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

एजाज लकडावालाच्या अटकेनंतर तारिक प्रवीण आणि सलीम महाराज यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये आयपीएस प्रवीण पडवळ यांनी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हे प्रकरण मिटवले हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे आता मुंबई क्राईम ब्रँचने पडवळ यांना समन्स पाठवले आहे. त्यामुळे त्यांना आता क्राईम ब्रँचसमोर उत्तर द्यावे लगाणार आहे.

आयपीएस प्रविण पडवळ यांना क्राईम ब्रँचने समन्स पाठवल्यानंतर ते सहआयुक्त संतोष रस्तोगी यांच्यासमोर हजर राहणार आहेत. प्रविण पडवळ हे सध्या मुंबई वाहतूक पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार पडवळ यांच्या उत्तरानुसार पोलीस दल आणि अंडरवर्ल्डशी संबंधीत धागेदोरे मिळू शकतात.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या प्रकरणाचा कसून तपास करून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश संबंधीतांना दिले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.