मुंबईत नववर्षाच्या स्वागतवेळी तरुणीचा खून; 2 संशयित ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   खारमध्ये (पश्चिम) नवं वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीत एका २१ वर्षीय तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडसह एका तरुणीने बेदम मारहाण केली. यातच तरुणीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे जान्हवी कुकरेजा असं मयत तरुणीचं नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी बॉयफ्रेंड श्री जोगधनकर (वय २२) आणि दिया पडणकर (वय १९) यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जान्हवीने श्री जोधनकरला दिया सोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितलं. जोधनकर आपल्याला धोका देत असल्याचा संशय जान्हवीला आला. त्यातूनच तिघांचा वाद सुरू झाला. लव्ह ट्रँगलमधून हा वाद निर्माण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खारमधील भगवती हायईट्स या इमारतीच्या टेरेसवर नव्या वर्षानिमित्त इमारतीत राहणाऱ्या तरुणांनी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत श्री जोगधनकर आणि दिया पडणकर यांच्यासह जान्हवी कुकरेजा या तरुणीलाही बोलवण्यात आलेलं होतं. पार्टीत सहभागी झालेल्या पोलिसांनी इतरांची चौकशी केली. मोठ्या आवाजात गाणी सुरू असताना अचानक तिघांमध्ये भांडण सुरू झालं. भांडण नेमकं कशामुळे सुरू झालं, याचा अंदाज कुणालाही आला नाही. जान्हवीच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितलं की, तिला दोघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या दोघांनी तिचे केस पकडून फरफटत दुसऱ्या मजल्यावर नेलं. त्यातच तिचा डोक्याला मार लागला व प्रचंड रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. पार्टीत असलेल्या सगळ्यांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. तोपर्यंत जान्हवीचा मृत्यू झाला होता. जोधनकर मुख्य संशयित आरोपी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ज्या इमारतीच्या टेरेसवर पार्टी आयोजित करण्यात आली होती, तिथे सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. फुटेजमध्ये जान्हवी साडेबारा वाजताच्या सुमारास संशयितांसोबत पार्टीतून बाहेर जाताना दिसत आहे. त्यानंतर अडीच वाजताच्या सुमारास ती मृत अवस्थेत आढळून आली.