मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Crime News | लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल बनवून गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवत उच्चभ्रू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) करून लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी एकास अटक केली आहे. हिमांशू पांचाळ Himanshu Yogeshbhai Panchal (वय-२६) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर हिमांशू पांचाळ याने बनावट प्रोफाईल तयार केली. यामध्ये त्याने गुन्हे शाखेचा सायबर विभागातील अधिकारी असल्याचे भासवले. खानदानी श्रीमंत असून गल्लेलठ्ठ पगार, भरपूर मालमत्ता असल्याचे त्याने त्यात नमुद केले होते. तो अनेक तरुणींना संपर्क करायचा. मग त्यांना भेटायला वसई, मुंबई परिसरातील लॉजमध्ये बोलवायचा. तेथे मुलींवर प्रभाव पाडायचा आणि त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवायचा. मुलींना तो नकली हिऱ्याचे दागिने भेट द्यायचा. पहिल्या भेटीतच तरुणींना शरीर संबंध ठेवण्यासाठी तो भाग पाडत होता. त्यानंतर वेगवेगळी कारणे देत मुलींकडून पैसे लुबाडत होता. तरुणीशी संबंध बनवल्यानंतर तो फरार व्हायचा.
याबाबत मीरा रीड येथील ३१ वर्षीय तरुणीने ६ फेब्रुवारीला वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर तिची ओळख हिमांशू पांचाळ याच्याशी झाली होती. त्याने तिला वसईच्या रुद्र शेल्टर या हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर तिच्याशी बळजबरीने शरीर संबंध देखील प्रस्थापित केले. २१ ते २३ जानेवारी रोजी त्याने तिला अहमदाबाद येथे बोलावून हॉटेल पॅरागॉन व्हिला येथेही तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले.
या काळात आरोपी हिमांशूने गोड बोलून पीडित तरुणीकडून आयफोन १६, ७८ हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने काढून घेतले. लग्न होणार असल्याने पीडित तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु नंतर तो फोन बंद करून पसार झाला. तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाणे गाठले.
या प्रकरणाबाबत वालीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप म्हणाले, “आरोपी हिमांशू पांचाळ हा बोलण्यात पटाईत होता. तो उत्तम इंग्रजी बोलून मुलींवर प्रभाव टाकायचा. एकाच वेळी ५ फोन, ॲपलचा लॅपटॉप वापरायचा. तो फक्त हॉटेलच्या वायफाय वरूनच मुलींशी व्हॉटसअप कॉलवरून बोलत होता. आम्ही तांत्रिक विश्लेषण करून त्याला अहमदाबाद येथून अटक केली. त्याने मागील दिड वर्षात १२ हून अधिक मुलींची अशाप्रकारे फसवणूक केली आहे.”
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक गोरखनाद जैद, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, विश्वासराव बाबर, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, पांडुरंग कुडू, बाळू कुटे, आदींच्या पथकाने केली.