Mumbai News : पेटलेल्या अवस्थेत प्रेयसीने प्रियकराला मारली मिठी, गंभीररित्या भाजल्याने तरुणाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका प्रियकराने थेट आपल्या प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिल्याची भीषण घटना मुंबईतील जोगेश्वरीमध्ये घडली आहे. पीडित तरुणीने पेटलेल्या अवस्थेत प्रियकराला घट्ट मिठी मारल्याने तो देखील 90 टक्के भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी मुंबईतील मेघवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विजय खांबे असे मृत्यू पावलेल्या प्रियकराचे नाव आहे. मेघवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरीतील गांधींनगर परिसरातील विजय खांबे याचे आपल्या मेव्हण्याच्या लहान बहिणीशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबधानंतर विजयने मुलीच्या आई वडिलांना लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र मुलीच्या घरून या लग्नाला विरोध होता. या सगळ्या वादामुळे त्याला दारुचे व्यसन लागले होते. त्यातच मुलीनेही त्याच्यासोबतचे संबध तोडले होते. त्यामुळे तो तिला त्रास देऊ लागला. त्यामुळे पीडित मुलीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी तब्बल एक आठवडा रुग्णालयात होती.

रुग्णालयातून घरी आल्यानंतर घरी कुणी नसल्याचे पाहून विजयने तिला भेटायला घरी गेला. तेंव्हा त्याने सोबत पेट्रोलची बाटली देखील आणली होती. घरात गेल्यावर त्याने मुलीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. मुलगी घराबाहेर पडण्यासाठी आरडाओरडा करत होती. मात्र विजय दरवाजात वाट अडवून उभा होता. शेवटी मुलीने विजयला पेटलेल्या अवस्थेत घट्ट मिठी मारली. पेटलेल्या अवस्थेत दोघे घराबाहेर आल्यानंतर उपस्थितांनी आग विझवली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. विजय या आगीत 90 टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. तर पीडीत तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे.