CSMT पूल दुर्घटना : शिवसेनेने मुंबईचं वाटोळे केलं 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सीएसएमटी येथे घडलेल्या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. त्यांना पूल कोसळल्याच्या दुर्घटनेसाठी जाब विचारला पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुखांना इकडे यायला त्यांच्याकडे वेळ नाही.  मुंबईचे वाटोळे शिवसेनेने केले अशी जोरदार टिकाही जयंत पाटील यांनी केली. सीएसएमटी येथे घडलेल्या घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं होते त्यानंतरही घटना घडली. याचा अर्थ स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदा कळलं आहे. ऑडिट करताना वरवर काम केलं गेलं त्यामुळे ही घटना घडली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

लोकांचे प्रश्न सोडवा टोलवाटोलवी करू नका –
ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळी महापालिका आणि रेल्वे विभागाने टोलवाटोलवी केली. लोकांचे प्रश्न सोडवा टोलवाटोलवी करू नका, भुयारी मार्ग निर्माण करा ज्यामुळे पुन्हा अशा घटना घडणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

पैशांच्या मदतीने काही होणार नाही –
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाली पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली आहे. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यु झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’ जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले.