पोलिस कोठडीत मृत्यू ! API, PSI सह 5 पोलिसांचं निलंबन, जमावावर लाठीचार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्यास जबाबदार धरून वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यानंतर देखील तेथील तणाव कायम आहे. दरम्यान, पोलिस कोठडीत विजय सिंह या तरूणाचा मृत्यू झाला होता.

त्याप्रकरणी संबंधित पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांकडून होत आहे. संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल होईपर्यंत विजय याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही असा इशारा कुटूंबियांनी दिला आहे. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या बाहेर तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांनी जमावाला हटविण्यासाठी लाठीचार्ज केला आहे.

जमावाकडून एका बेस्टच्या बसलाही लक्ष्य करण्यात आलं आहे. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्याच्या परिसरात सध्या मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका बसवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. त्यामध्ये बसचं मोठया प्रमाणावर नुकसान झालं असल्यानं तणावात आणखी वाढ झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोठडीत विजयच्या मृत्यूला जे पोलिस जबाबदार आहेत केवळ त्यांना निलंबीत करून चालणार नाही तर त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुटूंबियांनी केली आहे.

दरम्यान, मागणी मान्य होईपर्यंत विजयवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत असं विजयच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. रविवारी रात्री अ‍ॅन्टॉप हिल परिसरात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. घटनेची वर्दी मिळताच वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी पोहचलं. पोलिसांनी दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणलं. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असतानाच विजय सिंहच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यास नातेवाईकांनी तात्काळ सायन येथील लोकमान्य टिळक हॉस्पीटलमध्ये नेलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर विजयला मयत घोषित केलं.

त्यानंतर विजयच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीमुळेच विजयचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. विजयच्या नातेवाईकांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. नातेवाईकांनी आज वडाळा ट्रक ट्रर्मिनस पोलिस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केलं. प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांना तात्काळ निलंबीत केलं. त्यानंतर देखील विजय सिंहचे नातेवाईक जबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहेत.

Visit : Policenama.com