कर्जवाटपाच्या मनमानीमुळे मुंबई जिल्हा बँकेची चौकशी

पोलिसनामा आॉनलाईन – भांडवल पर्याप्ततेत झालेली घट आणि मनमानीप्रमाणे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला झालेला 47.99 कोटींचा तोटा तसेच झालेल्या कर्जवाटपाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी बँकेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी तीन अधिकार्‍यांची तपासणी समिती धाडली आहे. बँकेने मात्र ही नियमित तपासणी असल्याचा दावा केला आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती भाजपच्या ताब्यात असून विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बँकेचे अध्यक्ष आहेत. या बँकेत संचालक मंडळ मनमानीपणे कारभार करीत असल्याच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी एक समिती स्थापन केली आहे. त्यानुसार त्यांना एक महिन्यात तपासणी अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. बँकेने गेल्या दोन वर्षांत स्वयंपुनर्विकास योजनेंतर्गत मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी कर्ज मंजूर केले आहे. मात्र कोणत्याही बँकेस अशाप्रकारे गृहनिर्माण प्रकल्पांच्या स्वयंपुनर्विकासासाठी कर्जे देता येत नसल्याचे रिझर्व बँकेने स्पष्ट केल्यानंतर आता या प्रकरणाचीही तपासणी करण्याचा निर्णय सहकार आयुक्तालयाने घेतला आहे. त्यानुसार विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे, सहनिबंधक राजेश जाधवर आणि जिल्हा उपनिबंधक जे.डी. पाटील यांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीला बँके च्या कारभाराची तपासणी करून एक महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.