नवाब मलिक यांचे जावई समीर यांना ड्रग्ज केसमध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. मागील आठवड्यात समीर खान यांना दिवसभराच्या चौकशीनंतर एनसीबीने अटक केली होती.

महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या वांद्रे पश्चिम येथील घरातून सुमारे 200 किलो गांजा जप्त केलाय. त्यानंतर समीर खान यांना अटक केली होती. या प्रक्रियेचा भाग म्हणून एनसीबीने आज खान यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेलंय. त्यानंतर त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले. यावेळी, न्यायालयाने समीर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, कोणताही पक्षपात न करता कायद्याने काम केले पाहिजे. कायदा त्याचे काम करेल आणि सत्य लवकर समोर येईल. आपल्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे,’ असे जावयाच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिक लगेच ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली होती.

गेल्या आठवड्यात एनसीबीच्या पथकाने खार परिसरातून तिघांना अटक केली होती. त्यात ब्रिटिश नागरिक करण सजनानी याच्याबरोबर इतरही दोघांचा समावेश होता. त्यांच्या चौकशीतून ’मुच्छड पानवाला’ आणि मलिक यांचे जावई समीर खान यांचे नाव पुढे आले. त्यानंतर एनसीबीने समीर खान यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक केली होती.