मुंबईतील वीजपुरवठयाबाबत उर्जामंत्री नितीन राऊत म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह परिसरातील वीजपुरवठा सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक खंडित झाला. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्व सामान्यांचे हाल होत असून, लोकल सेवा, परीक्षांना मोठा फटका बसला आहे. त्यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. ऊर्जामंत्री कुठे आहेत, ते खुलासा करणार का, असे सवाल भाजपकडून विचारले जात आहेत. त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नितीन राऊत म्हणाले, “महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्कीट २ वर होता. मात्र, सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला आहे. तो अवघ्या अर्धा-पाऊण तासांत पुन्हा सुरळीत होईल. आमचे विद्युत कर्मचारी तिथं युद्धपातळीवर काम करत आहेत. लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

मुंबई आणि परिसरातील शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्ट कडून वीजपुरवठा करण्यात येतो. महापारेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. तेव्हा सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे. अचानक सगळ्या शहरांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. तद्वतच अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यार्थ्यांसोबत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या पॉवर कटचा फटका बसला. कारण या बिघाडामुळे लोकल सेवा सुद्धा ठप्प झाली आहे.