बडे बांधकाम व्यावसायिक, राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची ED कडून चौकशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक तसेच आमदार विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची ईडीकडून (सक्त वसूली संचानालय) शुक्रवारी मुंबई कार्यालयात चौकशी करण्यात आली. तर पुण्यातील घरी छापा टाकण्यात आल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसले यांची ईडीच्या तीन पथकांनी सलग आठ तास चौकशी केली. पण, या चौकशीचा तपशील उपलब्ध झाला नाही. भोसले यांचा बाणेर रस्त्यावर बंगला आहे. गणेशखिंड रस्त्यावर व्यावसायिक कार्यालय आहेत.

कृष्णा खोरे विकास महामंडळातील कामांचा ठेका मिळवून प्रकाशझोतात आलेले भोसले गेल्या काही वर्षात बडे बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जात आहेत. राजकीय नेत्यांबरोबर घनिष्ट संबंध असलेल्या भोसले यांनी अनेक मोठे बांधकाम प्रकल्प साकारले आहेत. यापूर्वीही प्राप्तीकर विभागाने भोसले यांची चौकशी केली आहे. तीन शहरात एकाच वेळी छापे टाकण्यात आल्याचे समजते. त्यात पुणे शहरातील त्यांच्या घरी छापा टाकला अशी चर्चा आहे. भोसले यांच्या मालकीचे हेलीकॉप्टर आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्या हेलीकॉप्टरचा वापर निवडणूक प्रचारासाठी करतात.

You might also like