मुंबईत पावसाची दमदार हजेरी, ठिकठिकाणी पाणी साचले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आठवडाभरपासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. पहाटेपासून उपनगरातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईतील दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत पााणी साचले आहे. रात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सांताक्रुज,अंधेरी, हिंदमाता, परेल, कुर्ला यासारख्या अनेक भागात ट्रफिक झाले असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळच्या वेळी अनेकजण कामासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यातच कोसळणार्‍या पावसामुळे चाकरमान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काही ठिकाणी गुडघाभर साचलेल्या पाण्यातून चाकरमान्यांना वाट काढावी लागत आहे. जास्तच पाणी साचल्यामुळे हिंदमाता उड्डाणपुलाखालचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईसह उपनगरात पुढील काही दिवस पावासाचा अंदाज वर्तवला आहे. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भामध्ये पुढील तीन-चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.