शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! ३१ जुलैपर्यंत विम्याची पूर्ण रक्कम मिळणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – शेतकरी पिकविम्यासाठी काढलेल्या मोर्चाने विमा कंपन्यांचे धाबे दणाणले असून ३१ जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना याचे पैसे मिळणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.

विमा भरपाई मिळावी म्हणून शिवसेनेच्या वतीने काल आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स कंपनीवर मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये या कंपनीच्या अधिकाऱ्यांना किती शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिल्याचा जाब विचारण्यात आला.

पंतप्रधान कृषी विमा योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना रक्कम मिळलेली नाही. हिंगोली, जालना, अकोला, चंद्रपूर, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी हफ्ता भरून देखील त्यांना विम्याची रक्कम कंपनीकडून दिली जात नसल्याने शिवसेनेनं हा मोर्चा काढला होता.

शेतकऱ्यांना विम्याचे पैसे अद्यापपर्यंत का दिले नाहीत ? त्याची करणे काय ? यांसारखे प्रश्न विचारल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी येत्या ८ दिवसांत ३४ कोटी रुपये रक्कम देण्याचे आश्वासन दिल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख-आमदार सदा सरवणकर आणि विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील सहभागी झाले होते. त्याचबरोबर यासंबंधातील लेखी आकडेवारी देण्याची मागणी या शिष्टमंडळाने कंपनीकडे केली.

दरम्यान, आठ दिवसांत जर शेतकऱ्यांना या विम्याची संपूर्ण रक्कम मिळाली नाही तर शिवसेना स्टाईलने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.