आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची मोदींनी विचारपूस केली का ? पंतप्रधान काय पाकिस्तानचे आहेत का ? – शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधी विचारपूस केली का, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलक करणारे शेतकरी पंजाबचे असल्याचं सांगतात. पंजाब काय पाकिस्तानमध्ये येतं का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेनं भव्य मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चाला पवार यांनी आझाद मैदानात संबोधित केलं.

१९५५-५६-५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी कष्टकरी वर्ग मुंबईतल्या रस्त्यांवर उतरला होता. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुंबईचं मोठं योगदान आहे. आता याच मुंबई नगरीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आले आहेत. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून सुरू असलेलं आंदोलन अभूतपूर्व आहे, असं पवार म्हणाले. शेतकऱ्यांचं कौतुक करणाऱ्या पवारांनी मोदी सरकारचा जोरदार समाचार घेतला. केंद्र सरकारनं कोणतीही चर्चा न करता कृषी कायदे आणले. एका अधिवेशनात एकाच दिवसात तीन कायदे मांडले गेले आणि ते लगेच मंजूर करून घेण्यात आले. त्याला राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि इतरांनी विरोध केला. चर्चेची मागणी केली. पण कोणत्याही चर्चेशिवाय कायद्यांना मंजुरी देण्यात आली, असं पवार यांनी यावेळी सांगितले.

कायद्यांवर चर्चा होते आणि मग ते मंजूर होतात, अशी पद्धत संसदीय लोकशाहीत आहे. पण तीन कृषी कायदे मंजूर करताना कोणतीही चर्चा केली नाही. हा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे. आज त्यांनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी कोणत्याही चर्चेविना कायदे केले. पण जनता तुम्हाला आणि तुमच्या कायद्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवारांनी दिला.

“आंदोलक शेतकरी पंजाबचे असल्याचं म्हणतात. पंजाब काय पाकिस्तानात येतं का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशाला स्वयंपूर्ण करण्यात पंजाबचं योगदान मोठं आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात पंजाबनं मोठी किंमत मोजली आहे. जालियनवाला बागेत रक्त सांडलं आहे. फाळणीवेळी पंजाबनं सर्वाधिक घाव सोसले आहेत, याची आठवण पवारांनी करून दिली. “कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. थंडी वाऱ्याची तमा न बाळगता शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांची पंतप्रधान मोदींनी साधी चौकशी तरी केली का?,” असा प्रश्न पवारांनी विचारला.