Coronavirus : ‘कोरोना’ रुग्णाची माहिती लपवल्यानं रत्नागिरीत खासगी डॉक्टरवर FIR

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबाधित रुग्णाबाबत माहिती लपवल्याच्या कारणावरून खेडमधील डॉ. जावेद महाडिक यांच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. संक्रमीत 50 वर्षीय मृत व्यक्ती दुबईहून परत आल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉक्टरांनी रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याबद्दल आणि त्याच्या प्रवासाचा इतिहास लपवून ठेवल्याचे ही पोलिसांनी सांगितले.

ही व्यक्ती दुबईमधून 17 मार्च रोजी परत आला होता. प्रकृती खालावल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. या व्यक्तीचा बुधवारी खेडमध्ये मृत्यू झाला. तो कोरोनाबाधीत होता. गेले काही दिवस त्याच्यावर खेडमध्ये उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला 6 एप्रिल रोजी खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्याच्या चाचणीचे अहवाल प्राप्त झाले.

त्यात तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीवर खेडमध्ये काही दिवस उपचार सुरु होते. मात्र, या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे असतानाही त्याबाबतची माहिती प्रशासनाला कळवण्यात आली नाही, असा ठपका ठेवून डॉ. जावेद महाडिक यांच्यविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 270 आणि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.