#video : पोलीस वसाहतीतील इमारतीला भीषण आग ; 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादर पोलीस वसाहतीत (सैतान चौकी) लागलेल्या भीषण आगीत एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सिलिंडरचा स्फोट होवुन ही आग लागली की अन्य कारणामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. आगीत होरपळून 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आगीमध्ये 3 घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

श्रावणी  (15) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दादर मधील सैतान पोलीस चौकीतील वसाहतीला आज (रविवार) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्‍नीशमन दलाचे 8 हून अधिक बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत 3 घरांचे मोठे नुकसान झाले होते. वसाहतीतील क्रमांक 5 च्या इमारतीमध्ये ही आग लागली होती. आगीत 3 र्‍या मजल्यावरील घरांचे नुकसान झाले आहे. श्रावणीचे आई-वडिल लग्‍न समारंभासाठी बाहेर गेले होते. ते बाहेर जात असताना घराला बाहेरून कुलूप लावुन गेले होते. त्यामुळे उलट-सुलट चर्चा होत आहे. आग लागली की आणखी काय झाले याबाबत तर्क-वितर्क काढले जात आहेत.