#CSTBridgeCollapse : संध्याकाळपर्यंत जबाबदारी कोणाची हे निश्चित करा : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिमालय पादचारी पूलाच्या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहेत, त्याची जबाबदारी शुक्रवारी सायंकाळपर्यंत निश्चित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. स्ट्रक्चरल आडिट झाल्यानंतरही पुल कोसळणे, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, ३० हून अधिक लोक जखमी झाले. सेंट जॉर्ज रुग्णालयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच घटनास्थळालाही नंतर भेट दिली.

मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

एल्फिन्स्टन, अंधेरी पुलाच्या दुर्घटनांनंतर शासनाने सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे या पादचारी पूलाचेही स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. त्यात काही जुजबी सूचना केल्या होत्या. या दुर्घटनेनंतर आता पुन्हा सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.

या पूलाच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहेत. त्याची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकप्रक्रिया सुरु झाल्यानंतर ही दुर्घटना घडली असून सरकारवर टिका करायला विरोधकांना आणखी एक कारण मिळाले आहे.

निवडणुक प्रक्रिया सुरु झाली असून शिवसेना, भाजपची युती झाल्याने नेहमीप्रमाणे त्यांना आता एकमेकावर ही जबाबदारी ढकलता येणार नाही. त्यामुळे दोषींवर तातडीने कारवाई करुन डॅमेज कंट्रोल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ह्याही बातम्या वाचा –

मशिदीमध्ये गोळीबार ; ६ जणांचा मृत्यु