मुंबईतील ‘त्या’ इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत : पालकमंत्री

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईमधील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांच्या मदततीची घोषणा करण्यात आली आहे. हि घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केलीय. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवासाची व्यवस्था सरकारच्या वतीने सकरण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

गुरूवारी फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली बिल्डिंगचा एक भाग कोसळला. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला तर, दोघेजण जखमी झाले आहेत. अग्निशामन दल व महानगरपालिकेच्या वतीने अद्याप शोध मोहिम सुरू आहे. या दुर्घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तेथील दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.

घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कर्मचारी, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतकार्य सुरु केले. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार दिले जावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करावी, अशा सूचना शेख यांनी प्रशासनाला दिल्यात. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त मदत मिळवून देण्यातसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना देखील जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.