Mumbai News : बोगस सोने देऊन खर्‍या सोन्याची किंमत घेणारी टोळी गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  ज्वेलर्सला नकली सोन दाखवून खऱ्या सोन्याची किंमत घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला दहिसर पोलिसांनी गजाआड केले आहे. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलिसांनी यांच्याकडून 65 ग्रॅम बोगस सोने आणि काही रोकड जप्त केली आहे.

सलमा फहीम काझी (वय 38 वर्ष) , गुड़िया झहुर खान ( वय 24 वर्ष), सलमा मेहताब बेग (वय 38 वर्ष), हरिश्चंद्र भोलानाथ सोनी ( वय 45 सर्व रा. नालासोपारा) अशी अटक केेलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र बाफना यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी 2021 रोजी महेंद्र बाफना नावाच्या ज्वेलर्सने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याच्या ज्वेलर्सच्या दुकानात एक महिला सोन्याची चैन घेऊन आली होती, आणि पैसे हवे असल्याने कर्जाऊ ठेवणार असल्याचे सांगितले. जेव्हा ज्वेलर्सने महिलेकडून बिल मागितले तेंव्हा ते सोन गिफ्टमध्ये आले असून त्याचे बिल नाही, असे सांगितले होते. पोलिसांनी सांगितले की, महिला जी सोने घेऊन आली होती, ते सोने नकली होते. मात्र त्याची कारागिरी अशी होती की, सोनारदेखील ते ओळखू शकला नाही.

अटक केलेले आरोपी ज्या भागातील ज्वेलर्सची फसवणूक करीत होते. त्या भागात राहत असल्याचे सांगत असत. या आरोपींविरोधात मीरारोड, नालासोपारा, सांताक्रुज आणि दहिसरसह मुंबई आणि परिसरात 40 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.