मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारीनंतर अग्नीशमनचे 17 बंब घटनास्थळी

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारी आल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपात्कालीन विभागाने दिली आहे. विशेषतः गोवंडी, भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून तक्रारींच्या आधारे अग्निशमन दलाकडून 17 गााड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाकडून तपासणी केल्यानंतर या कोणत्याही भागात गॅस गळती होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. अग्निशमन दलाकडून अद्यापही तपासणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून गॅस गळतीचे कारण आणि स्त्रोत याचा शोध सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आजूबाजूच्या भागांमध्ये तपासणी सुरू आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड, राष्ट्रीय रसायन व खत्याच्या अधिकार्‍यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली असून वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत चौकशीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. नागरिकांनी दारे, खिडक्या बंद ठेवाव्यात आणि कुणाला दुर्गंधीमुळे अति त्रास होऊ लागला तर नाकावर ओला कपडा ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यासंदर्भात महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकार्‍यांनी सांगितले, काल रात्री दहाच्या सुमारास मुंबईतील अनेक भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी आल्या. आपत्कालीन टीम त्या भागात पोहोचली आहे. आम्ही पाईपलाईन यंत्रणा तपासत आहोत आणि आतापर्यंत नुकसान किंवा गळतीची होत असल्याचे तपासणीदरम्यान आढळले नाही.