मुंबईत ‘गणेशोत्सवा’वर ‘कोरोना’चं सावट, वडाळ्याच्या GSB समितीनं घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन –   महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणाऱ्या गणपती उत्सवावर देखील यावर्षी कोरोना विषाणूचा परिणाम दिसू लागला आहे. सोमवारी शहरातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळांपैकी एक म्हणजे वडाळा येथील गौड सारस्वत ब्राह्मण सर्वजन गणेशोत्सव समितीने कोविड -19 च्या उद्रेकामुळे गणेश चतुर्थी उत्सव फेब्रुवारी 2021 पर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली.

विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोरोना संसर्गामुळे आगामी गणेशोत्सव साजरा न करण्याच्या पुण्यातील मंडळांच्या निर्णयाचे स्वागत केले. सध्याच्या साथीच्या पार्श्वभूमीवर मुंबई व राज्यातील इतर भागातील मंडळेही असाच निर्णय घेतील असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला होता. महाराष्ट्रात दरवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव हा येथील महत्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. दहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात प्रत्येक घरात दहा दिवस गणपती बसतात आणि सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी हा सोहळा देखील आयोजित केला जातो. लोक मोठ्या श्रद्धेने गणपतीची पूजा करतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असे म्हणतात की, पुणे जिल्ह्याने नेहमीच सामाजिक चळवळींचे नेतृत्व केले आहे आणि समाजाला दिशा दिली आहे. सामाजिक अंतर लक्षात घेऊन पुण्यातील मंडळांच्या प्रतिनिधींनी ऑनलाईन बैठक घेऊन गणेशोत्सवाबाबत हा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूमुळे गर्दी जमू नये म्हणून यंदा गणेशोत्सव साध्या आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाईल अशी घोषणा पुण्याच्या आठ प्रमुख गणेश मंडळांनी गुरुवारी केली. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या शहरांत सर्वाधिक संसर्गग्रस्त लोक आहेत.

महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 52667 झाली आहे. या साथीच्या आजारामुळे राज्यात आतापर्यंत 1695 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार 15786 लोक या आजारातून बरे झाले आहेत. मुंबईतही आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 31,789 वर पोहोचली असून आतापर्यंत 1026 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी मुंबईत कोरोना संक्रमणाची 1430 नवीन प्रकरणे नोंदली गेली.