कोरोना संकट : मुंबईतील डबेवाल्यांबाबत पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे लाखाच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मुंबईतील कार्यालये मागील चार महिन्यांपासून बंद आहेत. कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. यामध्ये लाखो चाकरनाम्यांना गरम जेवण पोहचवण्याचे काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांवर देखील याचा परिणाम झाला आहे.

लाखो चाकरनाम्यांना जेवण पुरवणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मुंबईतील डबेवाल्यांचं अनेक वर्षांपासून मुंबईकरांशी नांत जुळलं आहे. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या डबेवाल्यांसाठी मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी मोठा निर्णय घेतला आहे. डबेवाल्यांना थोडीशी मदत व्हावी, यासाठी त्यांना किराणा सामान तसेच इतर काही महत्त्वाच्या सेवा-सुविधा आणि आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. साधारण 400 पेक्षा अधिक डबेवाल्यांना याचा फायदा होणार असल्याचे असलम शेख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जुलै महिना अखेरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बकरी ईद देखील याच कालावधीत आहे. तसेच गणेशोत्सव देखील जवळ आला आहे. बकरी ईद आणि गणेशोत्सवाबाबत आज राज्य सरकारचे मंत्री चर्चा करणार आहेत. त्यानंतर बकरी ईद बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील. असंही असलम शेख यांनी यावेळी सांगितले.