डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे प्रकरणात मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला झापलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासातील निष्काळजीपणावरुन मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला झापलं आहे. शिवाय, दाभोळकर-पानसरे हत्याकांडाबाबत तपासाचा प्रगती अहवाल स्वीकारण्यासही हायकोर्टाने नकार दिला आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासातून काहीतरी शिका, असे म्हणत मुंबई हायकोर्टाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील दिरंगाईप्रकरणी सीबीआय, एसआयटीला झापलं.

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्याकांडाच्या तपासाचा सीलबंद अहवाल सीबीआय, एसआयटीने हायकोर्टात नेला होता, मात्र मुंबई हायकोर्टाने तपासावर नाराजी व्यक्त करत सीलबंद अहवाल न वाचताच परत केला. शिवाय, हत्याकांडाचा तपास आजवर निष्काळजीपणे हाताळला गेला, अशी खरमरीत टीका हायकोर्टाने केली.
[amazon_link asins=’B076CH6W5C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b47ac739-962d-11e8-a4df-2f0a24cc5caf’]
सीबीआयचे सहसंचालक, गृहसचिव आणि एसआयटीचे प्रमुख यांनी आज हायकोर्टात हजेरी लावली होती. त्यांच्यासमोरच हायकोर्टाने तपासावर प्रश्न उपस्थित करत झापलं. यावेळी हायकोर्टाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणात अत्यंत गंभीर निरीक्षणं नोंदवली आहेत. “तपास अहवालात वारंवार त्याच गोष्टी कोर्टापुढे मांडल्या जातात. तपास अधिकारी बदलले जातात. या घटनांचा समाजावर होणारा परिणाम फार गंभीर असतो, आम्हाला याची जास्त काळजी वाटते.”, असे हायकोर्टाने म्हटले.

शिवाय, सरकार बदलत राहील, पण देशाचं काय? प्रशासन गुन्हेगारांना वरचढ आहे, हे सिद्ध का करावं लागतंय? अशा प्रश्नांची सरबत्तीही हायकोर्टाने केली. तसेच, अशी परिस्थिती येईल की देशात प्रत्येकाला संरक्षण द्यावं लागेल, असेही हायकोर्ट म्हणाले.
या प्रकरणात तपास यंत्रणांकडून आणखी दोन महिन्यांचा अवधी मागितला गेला. त्यावरुनही हायकोर्टाने तपास यंत्रणांना झापलं.

“सणासुदीचे दिवस असल्यानं हा अवधी मागताय का? सारी फोर्स बंदोबस्तात व्यस्त असेल. उद्या हायकोर्टाच्या अस्तित्त्वावरही सवाल उठवले जातील. हायकोर्टाही काही करु शकत नाही, असा संदेश जाईल.”, असे म्हणत हायकोर्टाने तपास यंत्रणांना फटकारलं.