पत्रकार अर्णव गोस्वामींना उच्च न्यायालयाकडून दिलासा, पोलिसांना दिला ‘हा’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात दाखल दोन्ही एफआयआरना स्थगिती देत मुंबई हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई केली जाऊ नये, असे आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. मुंबई हायकोर्टाने मंगळवारी अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा देतानाच, त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरना स्थगिती दिली.

प्रथमदर्शनी असे दिसते की, त्यांच्यावर प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच गोस्वामी यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश मुंबई पोलिसांना हायकोर्टाने दिले आहेत.

पालघर झुंडबळीच्या घटनेवर वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह व बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. तसेच वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर श्रमिकांच्या जमलेल्या गर्दीविषयी आक्षेपार्ह व चिथावणी देणारी विधाने केल्याप्रकरणी दुसरा एफआयआरही नोंवदला होता.

मुंबई हायकोर्टाने गोस्वामी यांची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. गोस्वामी यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई केली जाऊ नये, असे आदेश देतानाच, खंडपीठाने 12 जून रोजी याचिकांवरील आदेश राखून ठेवला होता. गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि मिलिंद साठे यांनी कोर्टात बाजू मांडली. तर सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like