Lockdown : दुर्देवी ! 40 वर्षे सोबत संसार केला, त्यांना शेवटचं पाहू शकली नाही पत्नी, अंत्यदर्शनही VIDEO ‘कॉल’वर

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा काळ वाढवण्यात आला आहे. केवळ जिल्ह्याच्या सीमाच नाही तर गावाच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. पण कोरोनामुळे एका पत्नीला आपल्या पतीचे प्रत्यक्ष अंतिम दर्शनही घेता आले नाही. ४० वर्षे ज्यांच्यासोबत संसार केला त्यांना मृत्यूनंतर प्रत्यक्ष पाहता देखील आले नाही ही रुखरुख वासंती बांदेकर यांना अस्वस्थ करीत आहे.

वासंती यांचे पती चंद्रकांत लक्ष्मण बांदेकर हे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात कर्मचारी होते. दीनानाथच्या रंगमंचावर त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांचा आविष्कार पाहिला होता. दोडामार्ग तालुक्यातलं मोर्ले हे त्यांचं गाव. बांदेकरांचं दोन मुलगे आणि सुनांसह वास्तव्य होतं अंधेरी पूर्वच्या साई नगरमध्ये. पण त्यांनी आपल्या मोर्ले गावाशी नाळ घट्ट जोडली होती. त्यांचं नेहमी गावी येणे जाणे असायचे

यावेळच्या रामनवमीलाही नाट्यमोत्सवासाठी ते येणार होते. म्हणूनच होळीला गावी आलेल्या पत्नीला त्यांनी गावीच थांबण्यास सांगितलं होतं. पण लॉकडाउन सुरू झालं आणि गावी येण्याचे सगळे मार्गच बंद झाल . त्यातच कर्करोगामुळे बांदेकर यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे ते रामनवमीला मोर्ले गावी येऊ शकले नाहीत.अशा सगळ्या परिस्थितीत 16 एप्रिलला दुपारी दोन वाजता 67 वर्षांच्या चंद्रकांत बांदेकरांचं अकाली निधन झालं. वासंती त्यावेळेला गावी एकट्याच होत्या.

लॉकडाऊनमुळे मुंबईला जाण्यास अडथळे

बांदेकरांचं डेथ सर्टिफिकेट गावकऱ्यांपर्यत पोहोचलं. गाडीसाठी लागणाऱ्या परवानगीची कागदपत्रेही तयार झाली. पण लॉकडाउनमुळे वासंती याना मुंबईला घेवून जायचे झाल्यास त्यांच्यासोबत जाणाऱ्या गावातील अन्य दोघांना सक्तीने पुढचे पंधरा दिवस क्वारन्टाईन होउन राहावं लागणार होतं. शिवाय अंधेरी हा तसा हॉटस्पॉट एरिया असल्यामुळे वासंती यांच्यासोबत जायला कुणी तयारही होईना.

बांदेकर तुम्ही मला फसवलंत… !

आपल्याला आपल्या पतीचे अंत्यदर्शन जाता येणार नसल्याचं कळाल्यावर वासंती यांच्या दु:खाला सीमा उरली नाही . काहीही करा पण माझ्या नवऱ्याचा चेहरा एकदा तरी पाहू द्या अशी काळीज पिळवटून टाकणारी विनवणी त्या गावकऱ्यांना करू लागल्या. शेवटी गावकऱ्यानी बांदेकरांच्या मुलाला ही परिस्थिती सांगितली आणि मग अंधेरीतल्या त्यांच्या थोरल्या सुनेने मोर्लेचे पोलिस पाटील तुकाराम चिरमुरे यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. त्या मोबाईलवरुन आपल्या पतीचा चेहरा पाहताच वासंती यानी टाहो फोडला , ” बांदेकर तुम्ही मला फसवलंत!

अंधेरीतल्या मुलांनाही आईला पाहून दु:ख अनावर झालं. शेवटी व्हिडिओ कॉलवरच पुढचे सगळे विधी एकमेकाना दाखवावे लागले. शेवटी पाच जणानी अ‍ॅम्ब्युलन्समधून जाऊन बांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अशी वेळ आपल्यावर येईल असं स्वप्नात देखील वासंती याना वाटलं नव्हतं. चाळीस वर्षे ज्याच्यासोबत राहिलो त्या आपल्या प्रियकर पतीचा चेहरा आपण प्रत्यक्ष पाहू शकलो नाही याचं त्याना होत असलेलं दु:ख सांगताना मोर्लेचे गावकरीही गहिवरून गेले.