महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त ट्विट करणार्‍या IAS अधिकारी निधी चौधरींची ‘उचलबांगडी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा गांधींबाबत वादग्रस्त ट्विट करणा-या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. चौधरी यांची मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. निधी चौधरी यांच्या बदली संदर्भातील माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
निधी चौधरी यांनी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून त्यांचे नोटेवरील फोटो आणि जगभरातील पुतळे हटवण्याची मागणी करणारे ट्विट केले होते. तसेच गांधींना मारणारा नथुराम गोडसे याचे आभार मानले होते. त्यांच्या या वादग्रस्त ट्विटमुळे वादंग उठले होते. यानंतर चौधरी यांनी हे वादग्रस्त ट्विट डिलीट केले.

निधी चौधरी यांनी केलेल्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मगाणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिका-याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र असल्याचे पत्रात शरद पवार यानी म्हटले होते.