गुढीपाडव्याला संक्रातीच्या दिल्या शुभेच्छा आणि करावा लागला ‘या’ संक्रातीचा सामना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या देशात आयपीएलची धुंद तरूणाईवर चढली आहे. त्यात आयपीएलच्या अनेक नवनवीन किस्से घडत आहेत आणि समोरही येत आहेत. यात अजुन एका किस्स्याची भर पडली आहे. आज गुढीपाडवा आहे. त्यामुळे आयपीएलमधील मराठमोळा संघ मुंबई इंडियन्स संघाने शुभेच्छा देण्याच्या नादात चुक करून बसले आहेत. आज गुढीपाडवा असल्याने मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवरून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मात्र, या शुभेच्छा देताना मुंबई इंडियन्सने एक मोठा घोळ घातला.

सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने सर्व चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यानंतर सिद्देश लाड आणि सुर्यकुमार यादव यांनी गुढी पाडवा कसा साजरा करत होतो, हे सांगताना मकरसंक्रातीला आम्ही तिळगुळ कसे वाटायचो, हा किस्सा सांगायला सुरुवात केली. ही चूक नेटकऱ्यांच्या लगेच लक्षात आली. त्यामुळे नेटकऱ्यांनी मुंबई इंडियन्सला ट्रोल करायला सुरुवात केली.

गुढीपाडवा आणि मकर संक्रातीमधील फरक माहिती नाही का? संपूर्ण माहिती घेऊन व्हिडीओ तयार का केला नाही? मराठी असूनही गुढी पाडवा आणि संक्रातीमधील फरक माहित नाही का? अशा प्रकारच्या टीका नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यानंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आले. मात्र, तोपर्यंत या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे सध्या मुंबई इंडियन्स संघाची नाचक्की झाल्याने सर्वांकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.