रात्री महिलांसाठी ‘हे’ शहर सर्वाधिक सुरक्षित  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांसाठी मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. देशातील महानगरांमध्ये महिलांच्या दृष्टीने एकट्याने प्रवास करण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याचा अहवाल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) दिला आहे.

मुंबई सर्वात सुरक्षित तर दिल्ली सर्वात असुरक्षित –
गेल्या काही वर्षांपासून कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा हे मुद्दे नेहमी चर्चेत राहिले आहेत. कामाच्या निमित्ताने रात्री घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी कोणते शहर अधिक सुरक्षित आहे, याबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) चार महानगरांचा अभ्यास केला असून त्यानुसार महिलांसाठी रात्रीची मुंबई सर्वाधिक सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढला आहे. रात्री ९ वाजल्यानंतर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई या चार महानगरांत दिल्ली सर्वाधिक असुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे.

या आधारे निष्कर्ष – ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीमध्ये चार शहरांतील २० हजार ५९७ लोकांची मते घेतली. या मतांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार दिल्लीत केवळ १ टक्के लोकच महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असतात. बंगळुरूत २१ टक्के, मुंबईत १६ आणि चेन्नईत ५ टक्के लोक महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असल्याचे अभ्यासात दिसून आले. रात्री ९ नंतर घराबाहेर असणाऱ्या किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत अभ्यास केला असता दिल्लीतील ८७ टक्के महिलांचे कुटुंबीय चिंतेत असतात. बंगळुरूत रात्री घराबाहेर असणाऱ्या महिलांविषयी ५४ टक्के लोकांना भीती वाटते, चेन्नईत ४८ टक्के आणि मुंबईत ३० टक्के लोकांच्या मनात भीती असल्याचे दिसून आले.

यावरून रात्री एकटे घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी मुंबई हे इतर महानगरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे दिसून येते. रात्री ११ नंतर दिल्लीतील ९५ टक्के लोकांना घराबाहेर गेलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. बंगळुरूतील ८४ टक्के, चेन्नईत ८३ टक्के लोकांना घराबाहेर असलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. तर मुंबईतील ६० टक्के लोकांना ही भीती वाटत असते.

उपनगरी गाड्या, बेस्ट बस, टॅक्सी-रिक्षासारख्या साधनांमधून मुंबईत मध्यरात्रीही महिला एकट्या प्रवास करताना आढळतात. त्यामुळे मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर असल्याची चर्चा नेहमीच होते. आता एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महिलांनी मुंबईला आपली पसंती दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us