‘या’ महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार 50 रुपयांना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे बंद करण्यात आलेली लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. लोकल सेवा सुरु झाल्यानंतर मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने सरकारी यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुंबईत सर्वच स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट बंद केले आहे. मात्र वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सोडण्यास येणाऱ्या नातेवाईकांसाठी मध्य रेल्वेकडून मुंबई विभागातील महत्वाच्या 7 रेल्वे स्थानंकावर प्लॅटफॉर्म रेल्वे तिकीट देण्यात येणार आहे. मात्र या प्लॅटफॉर्मचे तिकिट दर 10 रुपयावरुन 50 रुपये करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेने मुंबई महानगर क्षेत्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यात कोरोनाचा धोका असल्याने रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने 24 फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेतला असून 15 जूनपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, भिवंडी रोड स्टेशन या स्थानकांचं प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्यात आलं आहे. यापूर्वी या स्टेशनवर 10 रुपये तिकीट होते. या रेल्वे स्टेशनवर नेहमी गर्दी असते. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने आणि कोविडचं संक्रमण अद्याप कमी झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर 10 रुपयांवरुन 50 रुपये करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर 23 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे देशातील संपूर्ण रेल्वे सेवा बंद होती. जून 2020 पासून देशात विशेष गाड्या चालवण्यात आलेल्या होत्या. तेव्हा फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात येत आहे. तसेच आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी आणि उन्हाळ्यात रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी फ्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, प्लॅटफॉर्म तिकिटाची वाढती मागणी पाहता आणि कोरोनाच्या संकटकाळात स्थानकावर गर्दी होऊ नये, म्हणून ही सुविधा केवळ मुंबई विभागाच्या सात स्थानकावर उपलब्ध केलेली आहे. कोरोना काळात प्लॅटफॉर्म तिकिट विक्री अद्यापही इतर स्थानकावर बंद आहे.