वकिलांना मुंबईत लोकलनं प्रवास करण्याची मुभा, ‘हे’ असतील नियम ! जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत (Mumbai) आता महिलांनंतर वकिलांनाही लोकल (Local) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु प्रायोगिक तत्वावर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय त्यांना वेळेचंही बंधन असणार आहे. लोकल सकाळी सुरू झाल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4 आणि सायंकाळी 7 नंतर शेवटची लोक असेपर्यंत प्रवासाला मुभा मिळाली आहे. वकिलांना गर्दीच्या वेळी प्रवास करता येणार नाही. तसंच मासिक पासही मिळणार नाही. प्रत्येक वेळी प्रवास करताना जाताना आणि येताना वेगळी तिकीटं काढावी लागणार आहेत.

महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलच्या अधिकृत ओळखपत्रावरच तिकीट दिलं जाणार आहे. याशिवाय अधिकृत कामासाठीच प्रवास करता येणार आहे. खासगी कामासाठी प्रवास करता येणार नाही अशी अटही घालण्यात आलेली आहे.

वकिलांनी लोकलनं प्रवास करता यावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात (High Court of Bombay) धाव घेतली होती. यानंतर आता वकिल आणि त्यांच्याकडील नोंदणीकृत कारकून लोकलनं प्रवास करू शकणार आहेत.

रेल्वेकडून (Railway) परवानगी मिळाल्यानंतर 23 नोव्हेंबर पर्यंत वकिलांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा आहे. ही मुभा प्रायोगिक तत्वार आहे. गर्दी आणि इतर गोष्टी पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल.

दरम्यान 20 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. रेल्वेमंत्री पियूष गोयल (Piyush Goyal)यांनी ही घोषणा केली होती.