Mumbai Local : मुंबईकरांना दिलासा ! मनपा अतिरिक्त आयुक्तांनी दिली लोकलबाबत महत्त्वाची माहिती

मुंबई : पोलीसामाना ऑनलाइन – मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल बंद करण्यात आली होती. मात्र, आता मुंबईत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल पुन्हा एकदा रुळावर आली आहे. लोकल सेवा कोणत्याही वेळेचं बंधन न ठेवता सर्वांसाठी कधीपासून सुरु होणार ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. लोकलने सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकावर चाकरमान्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आता या संदर्भात मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लोकलच्या वेळापत्रकासंदर्भात मोठी माहिती दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करुन आठवडा होऊन गेला आहे. त्यानंतरही रुग्णसंख्येत काही वाढ झालेली दिसत नाही. ही आनंदाची बाब आहे. येत्या 15 दिवसांत अशीच परिस्थिती राहिली तर लोकल सेवेचे वेळापत्रकात नक्कीच बदल केले जातील. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळू शकले.

सरसकट सर्वांसाठी लोकल सुरु करा
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात आली असली तरी यासाठी वेळेचं बंधन घालून देण्यात आले आहे. ठरवून देण्यात आलेली वेळ चाकरमान्यांसाठी उपयोगी ठरत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यासोबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे सरसकट लोकल सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

आज सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता
सर्वांसाठी सरसकट लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते. आज सुरेश काकाणी यांनीही लोकलबाबत लवकच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. मुंबईत आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला. मुंबईतील नायर रुग्णालयात सुरेश काकाणी यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.